Chintamani Aagman 2024: लाडक्या चिंतामणीची पहिली झलक आली समोर! बाप्पाचे हे रमणीय फोटो पाहाच...
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन सुरु झाले आहे. आज मुंबईतील तब्बल 41 गणपती बाप्पांचं आगमन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या दिमाखात या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. त्यारम्यान बाप्पाला पाहण्यासाठी तसेच आगमन सोहळा पाहण्यासाठी लालबाग परळ परिसरात आज मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. त्यात तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी समान मानला जातो.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं हे १०४ वे वर्ष आहे. चिंचपोकळीतील चिंतामणीच्या आगमनाची उत्सुकता लाखो भक्तांना लागली होती आणि अखेर बाप्पाचं देखणं रुप समोर आलं आहे. गेल्यावर्षी बाप्पाच्या आजूबाजूला भगवान हनुमंत, माता सीता आणि लक्ष्मण हे होते. मात्र यावेळेस बाप्पा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात असून त्याच्या सिंहासनावर जगन्नाथांचे स्वरुप आहे. चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे ढोल-ताश्याच्या गजरांमध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा आगमन सोहळा पार पडताना पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला दरवर्षी लाखो गणेश भक्तांची उपस्थिती असते. यावर्षीची चिंतामणीची मुर्ती विजय खातू आणि रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे. चिंतामणीची यावर्षीची मूर्ती सुंदर आणि मोहक रुपासह डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.